पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले आहे. या पदावर आता पार्थ पवार यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. रिक्त झालेल्या जागेवर नवीन संचालक कोण? याबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेणार आहेत.
अजित पवार हे तीस वर्षांहून अधिक काळ पुणे जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. ते बारामती तालुका अ वर्गातून ते निवडणूक लढवत होते. 1991मध्ये ते पहिल्यांदा बँकेचे संचालक झाले होते. बारामतीतील साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास राहिला असल्याने, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना देखील अशाच पद्धतीने राजकारणात सक्रीय केले जाणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये दाखल झाल्यापासून त्यांचे दोन्ही चिरंजीव जय आणि पार्थ पवार राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. पार्थ पवार यांनी यापूर्वी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र, यात त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. आता मात्र, अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.