Parliament Attack : नवी दिल्ली : संसदेत झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे आज देशभरात खळबळ उडाली. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत एकच हल्लकल्लोळ माजला. लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका तरूण आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे.
यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, अद्याप हे दोघे का आंदोलन करत होते ते समजेलेले नाही.
दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशन सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्ती लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांच्या हातात दोन कॅन होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. खासदारांनीच या दोघांना पकडले. तसेच संसदेची नवी इमारत सुरक्षेच्यादृष्टीने इतकी कमकुवत कशी? असाही प्रश्न विरोधी खासदारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती.