सुरेश घाडगे
Paranda News परंडा : परंडा मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्यावरील गैरकारभाराच्या आरोपाची सखोल चौकशी करणेकामी मुख्याधिकारी नगरपरिषद ( भूम जि.उस्मानाबाद ) यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.
आत्मदहन आंदोलन तुर्त मागे
सदर चौकशी समितीने विषयनिहाय चौकशी करून चौकशी अहवाल दि .२४ मे रोजी जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयास सादर केला आहे. प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषद येथील मुख्याधिकारी व संबंधीत कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवून त्यांचेविरुध्द नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी संबंधीत आंदोलकांना कळवल्याने दि . ३१ रोजी चे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती आंदोलक अॅड. नुरुद्दीन चौधरी यांनी ( दि. २९ ) माहिती दिली .
याबाबत माहिती अशी की, परंडा मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्यावरील गैरकारभाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली होती . मुख्याधिकारी यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा दि .३१ रोजी परंडा तहसिल कार्यालय येथे आत्मदहन करण्यात येईल .असे निवेदन जिल्हाधिकारी यांना गुरुवार (दि. १८ ) नगरसेवक अॅड . नुरोद्यीन चौधरी (काँग्रेस ) , माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी , इरफान शेख ( शिवसेना ( ठाकरे गट ) , माजी नगरसेवक जावेदखॉ पठाण , रहेमतुल्ला उर्फ सत्तार पठाण , जमील पठाण ( एमआयएम ता . अध्यक्ष ) ,अझहर शेख , समीर पठाण ,अॅड. जहिर चौधरी (भाजपा) ,सत्तार पठाण ,बाशा शहाबर्फीवाले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) यांनी दिले होते .
मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दि . ०२/१०/२०२२ रोजी परंडा तहसिल कार्यालयात आत्मदहनाचे आंदोलन केले होते . तसेच उपविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांना केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी भुम यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली होती . त्यांच्यासमोर या सर्वांनी मुख्याधिकारी यांच्या गैरकारभारा बाबत पुराव्यासह आरोप केले होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी भूम यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी योग्यरित्या होण्याकरिता तज्ञामार्फत चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमुद करून त्यांनी आपला अहवाल दि . ११/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवला होता . त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची दि . २७/१२/२०२२ रोजी मुख्याधिकारी यांची चौकशी होणेकामी तज्ञांची नियुक्ती करून चौकशी समिती करावी, अशी विनंती केली होती .
दि . ०६/०१/२०२३ रोजी चौकशी अधिकारी म्हणुन भुम नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच त्यांच्यासोबत दोन सदस्य चौकशी समिती नेमुण एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते . चौकशी समितीने दि . ३१/०१/२०२३ रोजी तक्रारदारांना नोटीस देवुन म्हणणे सादर करण्यास सांगितले होते . त्यानुसार त्यांनी दि . ३१/०१/२०२३ रोजी तोंडी व लेखी स्वरूपात व तसेच दि . १३/०२/२०२३ रोजी सर्व पुराव्यासह लेखी उत्तर दिलेले आहे. त्यास दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे.
परंतु अद्याप चौकशी अधिकार्यांनी अहवाल सादर केला आहे किंवा नाही. किंवा त्याच्या अनुषंगाने काय कारवाई प्रस्तावित केली आहे . याबाबतची कसलीच माहिती आजपर्यंत तक्रारदारांना देण्यात आलेली नाही . चौकशी तथा कारवाईस होत असलेला विलंब संयमाचा बांध तोडत आहे. त्यामुळे दि . २५/०५/२०२३ रोजीपर्यंत मुख्याधिकारी नगर परिषद परंडा यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई न झाल्यास दि . ३१/०५/२०२३ रोजी तहसिल कार्यालय परंडा येथे आत्मदहन करण्यात येईल . असा ईशारा देण्यात आला होता .
या अनुषंगाने दि .२४ मे रोजी जिल्हा आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद या कार्यालयास अहवाल सादर केला आहे. प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषद येथील मुख्याधिकारी व संबंधीत कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवून त्यांचेविरुध्द नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे हे आंदोलन तुर्त मागे घेण्यात आले आहे .