लहू चव्हाण
Panchgani पाचगणी : देशातील पहिले पुस्तकांचे गाव त्याचबरोबर लालचुटुक स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलार गावाला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिलार गावचे सुपुत्र प्रविण भिलारे यांच्याकडे सुपूर्द केल्याने भिलार गावात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
मौजे भिलार हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यालगत १ कि.मी. अंतरावर व पाचगणी पासून ५ कि.मी. अंतरावर तसेच महाबळेश्वर पासून १३ कि.मी. अंतरावर आहे. भिलार हे स्ट्रॉबेरी पिकासाठी प्रसिध्द असून तेथे स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा करण्यात येतो. भिलार गावाला देशातील व परदेशातील पर्यटक भेट देत असतात. राज्य शासनाने भिलार हे गाव देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून लोकार्पण केले आहे. मौजे भिलार येथील ग्रामदैवत श्री जन्नीमाता मंदिरास वर्षभर वेगवेगळ्या दिवशी भाविक व पर्यटक भेट देत असतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम असलेल्या भिलार गावाला ऐतिहासिक, पौराणिक, अध्यात्मिक आणि स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लाभला असून तसेच सामाजिक व राजकीय पटलावर नेहमीच सहकार्य जपणारे गाव आहे. या गावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयाने दि. १९ डिसेंबर २०२२ च्या पत्रान्वये सादर केला होता. त्यानुसार मौजे भिलार,(ता. महाबळेश्वर) या गावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
पुस्तकांच्या गावास हजारोंच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. सदर स्थळाचे राज्यस्तरीय महत्व, या स्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्व इत्यादी बाबी विचारात घेता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. टिडीएस-२०१६/११/प्र.क्र.८६२/पर्यटन, दि. २५ एप्रिल २०१७ अन्वये राज्यातील ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळे घोषित करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकष व कार्यपध्दती नुसार मौजे भिलार या गावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास याव्दारे आज मान्यता देण्यात आली आहे.
स्व.बाळासाहेब भिलारे यांना अनोखी श्रद्धांजली…
स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या अथक परिश्रमातून भिलारला देशात पाहिले पुस्तकांचं गाव म्हणून घोषित झाल्यानंतर या गावाला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळांचा दर्जा मिळावा यासाठी दादांनी विशेष प्रयत्न केले होते परंतु मध्येच त्यांना देवाज्ञा झाल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. हे स्वप्न करण्यासाठी प्रवीण भिलारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. भिलार गावाला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून स्व.भिलारे यांना त्यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे भिलार गावात आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
गेली दहा वर्षांपासून पुस्तकांचे गाव म्हणून भिलारची ओळख आहे.’ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने गावाचा विकास होणार आहे.गावातील तरुण पर्यटन व्यवसायाकडे वळल्याने या निर्णयामुळे पुढच्या पिढीचा फायदा होणार आहे.
नितीन प्रल्हाद भिलारे, अध्यक्ष ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशन