लहू चव्हाण
Panchgani पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन नगरी पाचगणी शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आहे. शिवजयंतीची जय्यत तयारी झाली असून अक्षय्यतृतीयेदिवशी तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाचगणी व परिसर शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकांभोवतालचे रस्ते देखील भगवेमय झाले आहेत.
बाजारपेठेत ठिकठिकाणी कमानी, भगव्या पताका व झेंड्यांमुळे वातावरण शिवमय झाले आहे. भगवे झेंडे बाजारपेठेत आकर्षणाचे केंद्र बनले असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे़. पर्यटन नगरी शिवजयंतीसाठी सज्ज झाली असून अवघे पाचगणी शहर शिवमय झाले आहे.
१८ मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या शिवजयंती साजरी करतात…!
पाचगणी शहर व परिसरातील १८ मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. यावर्षी हा उत्सव २१ ते २२ एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. २१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक दांडपट्टा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य महिलांचे लेझीम पथक, बाइक रॅली त्याचबरोबर महिलांच्या हस्ते दोनशे मशाली प्रज्वलित करून मशाल मोहत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिवंत देखावा, झांज पथक, पालखी मिरवणूक, राज्याभिषेक सोहळा व महाआरती होणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना चहा, पाणी व नाष्ट्याची सोय समिती मार्फत सोय करण्यात आली आहे.