लहू चव्हाण
Panchgani News पाचगणी : शहर व परिसरातील विविध मंडळांनी आगामी शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा, असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
२२ एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव सोहळा…!
येत्या २२ एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस ठाण्यात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माने बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.”
सोशल मिडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटन नगरी शहरात पाचगणी व परिसर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शिवजयंती शांततेत साजरी केली जाते, ही अभिमानास्पद बाब आहे. मिरवणुकीत मद्यपान करू नये असे आवाहनही माने यांनी केले.
यावेळी पाचगणी व परिसर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.