लहू चव्हाण
Panchgani News : पाचगणी, (सातारा) : पर्यावरणचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास रोखण्यासाठी एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार बंदी घातलेल्या ‘सिंगल यूज’ प्लास्टिकला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पांचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे पथकाने कडक कारवाई सुरू केली असून पालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील शॉपींग सेंटर येथून ६ किलो प्लास्टिक जप्त करून ६५०० रुपये दंड वसूल केला. (Panchgani News)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी रेखा तोंबरे यांचे आदेशानुसार पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे , शहर समन्व्यक ओंकार ढोले व कर्मचारी यांच्यामार्फत सिंगल युज प्लास्टिक बॅन बाबत शहरात कारवाई करण्यात आली. (Panchgani News)
या कारवाईत शहरातील शॉपिंग सेंटर येथील दुकानाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिक बाबत उल्लंघन केले आहे त्यांच्याकडून रुपये ६५०० इतका दंड वसूल करण्यात आला. या कारवाई मध्ये एकूण ६ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले. (Panchgani News)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून, सध्या या मोहिमेअंतर्गत सिंगल-यूज प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या १९ वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, काटे-चमचे, कप, ग्लास आणि प्लेट आदींचा समावेश आहे. या वस्तू वापरायच्या की नाही असा पर्याय आता दुकानदारांकडे किंवा हॉटेल व्यावसायिकांकडे नाही. या वस्तूंवर पूर्णपणे बंदी असणार आहे. (Panchgani News)
या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकान किंवा हॉटेलचे लायसन्स देखील रद्द होऊ शकते. अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.यावेळी जाधव म्हणाले प्लॅस्टिकच्या कचऱ्यात रोजच्या वापरातल्या ‘सिंगल यूज’ म्हणजे एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण सर्वांत जास्त असतं. त्यामुळेच अनेक देशांनी अशा प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. नागरिक व व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणे टाळावे असे आवाहनही जाधव यांनी केले. (Panchgani News)