लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी शहराने पर्यटनात बाजी मारली असून राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट पुरस्कारामध्ये पाचगणी नगरपरिषदेला देशात सर्वोत्कृष्ट नागरी सुविधा ( ब श्रेणी) मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.
दरवर्षी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना काळात दोन वर्ष हे पुरस्कार दिले नव्हते. त्यामुळे सन २०१८-१९ या वर्षाकरीताचे पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी तसेच पर्यटन सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार हे हॉटेल, वाहतूक, गाईड, वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणीत काम करणाऱ्या खाजगी व सार्वजनिक संस्थांना दिला जातो. पाचगणी नगरपरिषदेला प्रथमच सर्वोकृष्ट सर्वकष पर्यटन विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी शहर वासियांच्या वतीने स्विकारला.
नगरपरिषदेला मिळालेल्या पुरस्काराबाबत आणि सन्मानाबाबत अभिमान वाटतो.नागरिक व पदाधिकाऱ्यांचा सहभाग आणि पालिका कर्मचारी,अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली. पुरस्कार मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर व माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे यांनी दिली.