संतोष पवार
पुणे : टाळ मृदुंगाचा गजर ,मुखी विठ्ठल नामाचा जयघोष, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ,हातामध्ये विणा असलेले वारकरी यांनी पुणे सोलापूर महामार्ग भक्तीमय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनंत काळापासून सुरू असलेला संतपरंपरेचा वारसा पुढे अखंडितपणे चालू ठेवत, मोठ्या भक्ती भावाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव जन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहे.
स्वयंशिस्त स्त्री पुरुष समानता, विज्ञानवादी दृष्टिकोन यांचा स्पर्श लाभलेली वारी म्हणजे देव व भक्त यांचा भक्ती सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याची आस वारकरी भक्तांना लागलेली आहे. सध्या पुणे सोलापूर महामार्गावरती अनेक छोट्या मोठ्या पालख्या, दिंड्यांमध्ये हजारो वारकरी सामील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजा शेतातील पेरणीची कामे आटपून विठ्ठल भेटीसाठी सज्ज झाला आहे.
श्रीगोंदा कर्जत दौंड करमाळा या तालुक्यातील तसेच कोकणातील रायगड पनवेल ठाणे या भागातूनही बहुतांश दिंड्या छोट्या-मोठ्या पालख्या या पुणे सोलापूर महामार्गाचा वापर करून पंढरीची वारी पार पाडतात. संत शेख महंमद महाराज पालखी सोहळा, चांगावटेश्वर पालखी , चौरंगीनाथ महाराज पालखी यांसारख्या मोठया पालखी सोहळ्यात अनेक लहान मोठ्या दिंड्याही सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. महामार्गा लगतच्या असणाऱ्या स्थानिक गावातील दिंड्याही याच महामार्गावरून पंढरीकडे प्रवास करतात.
महामार्गाच्या बाजूला असलेला प्रशस्त सेवा रस्ता हा वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत आहे. पंढरीच्या दिशेने निघालेल्या दिंड्या पालख्यांचा मुक्काम महामार्गालगतच्या गावांमध्ये होत आहे. स्थानिक प्रशासन ग्रामपंचायती ग्रामस्थ आरोग्य यंत्रणा यांच्याकडून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जाते. त्यांच्या निवासाची भोजनाची सोय व इतर सर्व सुविधा पुरविल्या जातात. याशिवाय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना महामार्ग पोलिसांची मोठी मदत होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी महामार्ग पोलीस घेत आहेत. गावोगावी विसाव्यासाठी असलेल्या दिंड्या पालख्यांमध्ये रात्रीच्या वेळेला भजन कीर्तन नामस्मरण प्रवचन यांचे आयोजन केले जात आहे.