भिगवण : आषाढी एकादशी निमित्त भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला इंटरनॅशन स्कूल व दत्तकला सी. बी. एस. ई. च्या विद्यार्थ्यांनी प्रांगणात पावल्या खेळत, अभंग, भजन, टाळ वाजवीत, सुंदर पताका खांद्यावर घेऊन रिंगण करीत पालखी सोहळा साजरा झाला.
हरिनामाचा, ज्ञानोबा-तुकाराम माऊलीचा गजर करत अतिशय उत्साहामध्ये पालखी सोहळा साजरा झाला. यावेळी पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिक टाळा, झाडे लावा, असा संदेश हाती फलक घेऊन विद्यार्थ्यांनी दिला. विठुरायाच्या प्रतिमेचे सजावट केली होती. आणि प्रतिमा ट्रॅक्टरमध्ये बसवून पालखी तयार करण्यात आली. त्यानंतर पालखीची मिरवणूक संस्थेच्या विविध विभागांच्या समोरून काढण्यात आली होती. या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य केले. तर झांज, हलगी आणि ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
वैष्णवांचा मेळावा भरल्याप्रमाणे शाळेला स्वरूप प्राप्त झाले होते. विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला. दिंडी, पालखी व वारकरी असा रंगतदार पालखी सोहळा व विठू-नामाच्या जयघोषात बालगोपाळांनी परिसर दुमदुमून गेला. रिंगण सोहळ्यात पुस्तक दिंडी, मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. विविध विभागांच्या प्रमुखांनी फुगडी खेळली. शेवटी गोल रिंगणसोहळा संपन्न झाला. आणि पालखी सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, या कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर, डायरेक्टर नंदा ताटे, प्राचार्या सिंधू यादव, प्रा. धर्मेंद्र धेंडे आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. या शाळेतील मुले विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या पारंपारिक वेशभूषेत सजली होती. विठ्ठल-विठ्ठल, ज्ञानोबा माउलींच्या गजरात मुलांनी पालखीचा आनंद अनुभवला.