लहू चव्हाण
पाचगणी : गेली ११ वर्षांपासून बंद असलेली पाचगणी-राजपुरी बससेवा आज सोमवारपासून (ता.३) सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु झाली आहे. बससेवा सुरु करण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी केलेल्या पाठपुराव्यांना यश आले आहे.
गेली ११ वर्षांपासून बंद असलेली बस सेवा सुरु व्हावी. म्हणून विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी आगारप्रमुखाना निवेदनही देण्यात आले होते. बस सेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. त्यामुळे खिंगर, आंब्रळ, राजपुरी गावचे ग्रामस्थ वारंवार हि बाब निर्दशनास आणून देत होते.
दरम्यान, ग्रामस्थांची होणारी गैरसोय पाहून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी सातारा परिवहन एस टी महामंडळ अधिकाऱ्यांना भेटून बस सेवा सुरु करण्यासाठी निवेदन दिले. तसेच बससेवा सुरु न केल्यास आंदोलन व उपोषणाचा इशारा दिला. याची अधिकाऱ्यांनी दखल घेऊन एस टी मार्ग तपासणी लवकरात लवकर बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर एस टीच्या अधिकाऱ्यांनी बससेवेला परवानगी दिली आहे. त्यानुसार आज सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पाचगणी-राजपुरी बस सेवा सुरु करण्यात आली. यावेळी परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व वाहक यांना गुलाब पुष्प देऊन, प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.या वेळी पांचगणी आगारप्रमुख नामदेव पंतगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, मंगेश उपाध्याय, रविकांत कांबळे, विक्रांत जाधव, किसान मोर्चा सरचिटणीस संतोष कवी आदी मान्यवर उपस्थित होते.