लहू चव्हाण,
Pachgani News : (सातारा) : पाचगणी नगरपालिकेने पाणी निचऱ्यासाठी योग्य नियोजन न केल्याने पहिल्या पावसातच एसटी स्थानक परिसरातील पितळ उघडे पडले आहे. पावसामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर टेबल लॅंन्ड पठारावरील येणारे पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे बसस्थानकात ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.(Pachgani News)
पाचगणी नगरपालिकेने पाणी निचऱ्यासाठी योग्य नियोजन न केल्याने पाचगणी नगरपरिषदेने टेबल लॅंन्ड पठारावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधले असले तरी त्यातून पाण्याचा निचरा होण्याऐवजी तेच पाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगत असणाऱ्या चेंबरमधून ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होत आहे. सुरुर ते पोलादपूर हा राज्यमार्ग पाचगणी – महाबळेश्वर या दोन्ही पर्यटन स्थळाला जोडत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. (Pachgani News)
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच पाणी तुंबत असल्याने प्रवाशांना या पाण्यातून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्याच बरोबर या परिसरात चार – पाच शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्याही वर्दळ असते. पालिकेने पाणी निचऱ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पादचारी व नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.(Pachgani News)
दरम्यान, परिसरात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यातून मार्ग काढताना प्रवाशांच्या नाकी नऊ आले. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पहिल्याच पावसाने असे होत असेल तर संपूर्ण पावसाळ्यात काय होईल, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता.