लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील वाहनतळांना छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महान विभूतींची नावे द्यावीत, अशी मागणी पँथर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे पाचगणी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.
पाचगणी नगरपरिषदेकडे मागणी
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचगणीमधील पारशी पॉईंट, सिडनी पॉईंट, तसेच बेबी पॉईंट, टाऊन हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील वाहनतळ यापैकी कोणत्याही दोन स्थळांना छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे. (Pachgani News) पँथर सेनेच्या वतीने यापूर्वीही जनतेच्या मागणीवरुन निवेदन दिले होते; परंतु याची दखल घेतली गेली नाही. या मागणीचा विचार करून, या दोन्ही विभूतींचा सन्मान करावा, अशी मागणी होत आहे.
या वेळी बोलताना पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक कांबळे म्हणाले की, आम्हाला या निवदेनाद्वारे शासन दरबारी मागणी करावी लागत आहे. (Pachgani News) आमच्या या निवेदनाचा व लोकभावनेचा विचार करुन, योग्य निर्णय आम्हाला लेखी स्वरुपात लवकरात लवकर कळवावा. अन्यथा, या मागणीसाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी महापालिकेला घ्यावी लागेल.
या निवेदनावर नागरिकांच्या सह्या असून, हे निवेदन पाचगणी पालिकेच्या अधिकाऱ्याला देण्यात आले. या वेळी सुनंदा मोरे, संगीता मोहिते, अंजली गुल्ला, शेखर मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.