लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, शहराच्या नावलौकिकात भर पडावी, त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिवल’साठी पाचगणीकर एका छताखाली एकवटले आहेत. १ ते ३ डिसेंबर रोजी पाचगणी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी आणि पाचगणी शहराच्या नावलौकिकात अधिक भर पडावी यासाठी शहरातील सर्व नागरिक, अगदी छोट्या व्यवसायिकांपासून ते शाळाप्रमुख, रोटरी क्लब, सार्वजनिक मंडळ, नगरपालिका, पोलीस यंत्रणेबरोबरच शासकीय कार्यालये यांनी हातात हात घालून एकत्र येण्याची संकल्पना आठ वर्षांपूर्वी रुजली आणि पाचगणीकर एकत्र येऊन ‘आय लव्ह पाचगणी’ उत्सव उदयास आला. लाखो पर्यटकांनी या सोहळ्याचा मनसोक्त आस्वाद घेतला.
तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काईट फेस्टिवल, ट्रेजर हंट, आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, टर्म ऑफ वॉर, सांस्कृतिक कार्यक्रम, वॉकिंग प्लाझा, लाईव्ह बँड अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ३ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात फेस्टिवल होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
या वेळी फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष शाॅरम जवानमर्दी, सचिव किरण पवार, मुराद खान, खजिनदार निहाल बागवान, माजी अध्यक्ष राजेंद्र भगद, भारत पुरोहित, राजेंद्र पार्टे, नितीन भिलारे, आदित्य गोळे, मेहुल पुरोहित, जयवंत भिलारे, भुषण बोधे आदी संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.