नवी मुंबई : बापा लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याचं 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी चिमुकलीवर अश्लिल आणि लैंगिक चाळे करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घणसोली रोड परिसरात ही घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी या घटनेतील 32 वर्षीय नराधम पित्याला अटक केल असून त्याच्यावर बलात्कारासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह घणसोली येथं राहत होता. 26 डिसेंबर रोजी पीडित मुलगी घरामध्ये एकटी असताना, आरोपी पित्याने आपल्या तीन वर्षीय मुलीसोबत अश्लिल आणि लैंगिक चाळे करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
याबाबतची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली. लेकीच्या तोंडातून बापाने केलेल्या कृत्याबद्दल ऐकताच ऐकून तिला धक्का बसला. आईने मुलीकडे आणखी विचारपुस केली असता, मागील अनेक दिवसांपासून नराधम पिता तिच्यासोबत जबरदस्तीने अश्लिल आणि लैंगिक चाळे करत असल्याची माहिती दिली.
आपल्या नवऱ्याच्या या सैतानी कृत्यामुळे ती पुरती हादरून गेली होती. पीडित मुलीला घेऊन आईने याबद्दल पतीकडे चौकशी केली असता, त्याने उलट तिला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने रबाळे पोलीस ठाणे गाठून आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीच्या पित्यावर बलात्कारासह पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.