मुंबई : शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होतात आणि त्यावरती चर्चा देखील होत असते. शिक्षणाबाबत प्रकाशजी जावडेकर आणि माझे चांगले विचार आहेत. तसेच आमचे मतभेद देखील आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीत मात्र आम्ही एकत्रित आहेत. मराठी भाषेवर आपण प्रेम केलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीलाही मराठी भाषा चांगली आली पाहिजे. आर. आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्याची मुलं सरकारी शाळेत गेलेले नाही, हे वास्तव आहे. अगदी मीही सरकारी शाळेत गेलीली नाही. पवार कुटुंबात कॉन्व्हेंट मध्ये जाणारं पहिलं मूल म्हणजे मी आहे.
आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकली..
माझ्या वडिलांचं फार म्हणणं होतं की मी मराठी शाळेत शिकावं, परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकली. घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं. बाहेर जरी ते शरद पवार असले तरी घरात ते नवराच आहेत. आता याची हेडलाईन करू नका, नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील. असा मिश्किल शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित 15वी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
चॅट जीपीटीच्या माध्यमातून पोरं गृहपाठ करायला लागली तर..
यशस्वी झाल्यावर नापास झालेल्या मुलांची कथा फार चांगली वाटते. कुठलंही मूल धन असतं ह्या मताची मी आहे. मला दोन मुलं आहेत, ते वाढवताना केवढा त्रास होतो. परंतु शिक्षक चाळीस मुलांना सांभाळतात. त्या मुलांची आयक्यू पातळी वेगवेगळी असते त्यांना ते सांभाळतात हे विशेष आहे. जे नवीन तंत्रज्ञान येतं ते शिकावं या मताची मी आहे, मला पण ते आवडतं. परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटते. चॅट जीपीटीची भीती वाटते. चॅट जीपीटीच्या माध्यमातून पोरं गृहपाठ करायला लागली तर मेंदूच आकलन कसं होईल? हा खूप गंभीर विषय असल्याची भीती खासदार सुप्रिया सुळेंनी बोलताना व्यक्त केली आहे.
शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे..
तंत्रज्ञानामुळे केवळ शिक्षकांच्या नौकाऱ्य जाणार नाहीत, कारण शिक्षक ही नोकरी नाहीये तर ती सेवा आहे. आई-वडिलांनंतर माझ्यावर संस्कार हे शिक्षकांनी केले. माझं गणित अगोदरही कच्चं होतं आताही कच्च आहे. कारण मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही. पायाभूत सुविधांना एवढे पैसे दिले जातात, मग शिक्षणाकडे का लक्ष दिले जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शैक्षणिक पायाभूत सुविधा व्हाव्यात या मताची मी आहे. परंतु मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, त्याकडे प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षणासाठी निधी दिला नाही तर एक पिढी शिकू शकणार नाही. शिक्षणात राजकारण येऊ नये, या मताची मी असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.