लोणी काळभोर : वर्ष समाप्तीच्या शेवटीला नागरिकांसमोर कचऱ्यासह पाण्याची खूप मोठी समस्या उभी आहे. याबरोबरच लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी या दरम्यान शिवरस्त्याचा निर्णयही अत्यंत महत्वाचा आहे. एकीकडे जरी सत्ताधारी हे निर्णय विकासाच्या दृष्टीकोनातून चांगले असल्याचे सांगत असले तरी विरोधक मात्र हे निर्णय चुकीचे असून त्याला विरोध करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असून त्यांच्यामध्ये उद्या खडाजंगी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कदमवाकवस्तीची ग्रामसभा गाजणार आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता.25) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामसभा होणार आहे. ही ग्रामसभा उपसरपंच नासीरखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयांना खूप महत्व असल्याने सर्व ग्रामस्थांनी या सभेसाठी उपस्थित राहावे. असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
या ग्रामसभेत मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत (प्रोसिडिंग) वाचून कायम करणे. वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या पत्र व्यवहाराचे वाचन करणे व आलेल्या अर्जाचा विचार करणे, सर्वाची योजना सर्वांचा विकास सन 2025/26 चा आराखडा तयार करणे, 100 टक्के कर वसुली करणे बाबत. नळ पाणीपुरवठा योजना लोकवर्गणी जमा करणे बाबत. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घरोघरी ओला सुका कचरा संकलन 1 जानेवारी 2025 पासून सुरु करणे बाबत व ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांचे परवानगीने येणारे विषय घेण्यात येणार आहेत. अशा विषयांवर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांसमोर कचरा व पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवित आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरातून कचरा उचलण्याची व्यवस्था नववर्षापासून सुरु करीत आहेत. मात्र या समस्येतून नागरिकांची कायमची सुटका होईल? की पुन्हा या समस्या जैसे थे राहतील. त्यामुळे उद्या होणाऱ्या या ग्रामसभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.