संतोष पवार
पुणे : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील उच्चशिक्षण संस्था आणि वसतीगृहांमधील विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाबरोबरच महिला सुरक्षितता विषयक कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ विषयक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारी (दि.२० सप्टेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे विभागीय कार्यशाळेचे आयोजन केले असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिकशास्त्र संकुलामधील नव्या सभागृहामध्ये ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे विशाखा मार्गदर्शक तत्त्वे, कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक छळ प्रतिबंध कायदा २०१३, विद्यापीठ अनुदान आयोगाची या विषयीची मार्गदर्शक तत्त्वे व महिला सुरक्षेसंदर्भात केलेल्या शिफारसी, महिला वसतिगृहांसाठी सुरक्षा उपाययोजना आदी बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.