दिनेश सोनवणे
दौंड : महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत इमारतीत कार्यालय उपलब्ध करण्यात यावी. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व पोलीस पाटील यांना ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग किंवा ग्रामनिधी तुन एक टेबल,चार खुर्ची, एक कपाट उपलब्ध करून देणेबाबत आदेश दिले होते. याची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिल्या आहे.
दौंड तालुका पोलीस पाटील पदाधिकारी व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक दौंड पंचायत समिती सभागृहात पार पडली. हि बैठक गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यावेळी वरील सूचना अजिंक्य येळे यांनी दिली आहे.
दरम्यान, ग्रामस्तरावर येणाऱ्या आपत्कालीन संकटावेळी प्रभावी ठरणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणा ज्या गावातील बंद आहेत. त्या ग्रामपंचायत नी बिल भरून तात्काळ चालू करावीत, गावामध्ये ग्रामपंचायत निधीतून महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. या मागण्या पोलीस पाटील यांच्या कडून करण्यात आल्या.
पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन योग्य त्या उपाय योजना राबविण्यात येतील असे आश्वासन गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिले. अशी माहिती देऊळगावचे पोलीस पाटील किरण पोळ यांनी दिली.