नागपूर: विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेल्या भाषणावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मराठा आरक्षण देता येत नसल्याने त्यांनी आता मराठा समाजाला गाजर दाखवण्यास सुरुवात केली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. विधीमंडळ परिसरात विरोधकांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणावर उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांचे आजचे उत्तर म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असा आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असे सांगितले होते. निवडणुकीपर्यंत वेळ मारून न्यायची आणि आचारसंहिता आली की मग पूर्ण विषय संपवायचा असा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले की, 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत सरकारकडे करायला काही नाही. फक्त आतापर्यंतचा इतिहास मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितला. मराठा आरक्षणासाठी कोर्टात जे वकील आमच्या सरकारच्या वेळी होते तेच वकील आता आहेत असे त्यांनी म्हटले.
24 तारखेपर्यंत निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले. सरकारकडून आता गाजर दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आमच्या सरकारमध्ये हायकोर्टात वकील होते, तेच सर्वोच्च न्यायालयात होते त्यामुळे धांदात खोटे आरोप आमच्या सरकारवर केले असल्याचेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी आजची वेळ मारून नेली.