पुणे : भैरवनाथ भोसरी व जयवंत क्रीडा प्रतिष्ठान या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करतना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
नातूबाग येथील मैदानावर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, दत्तात्रय धनकवडे, जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरस्वती क्रीडा संस्था पुणेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, नगरसेवक गोपाळ चिंतल, भाऊ चव्हाण, राजेंद्र मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज झालेल्या सलामीच्या लढतीत भैरवनाथ भोसरी संघाने मयुरेश्वर कबड्डी संघाला ३४-३ असे ३१ गुणांनी पराभूत करताना विजयी सलामी दिली. भैरवनाथ संघाने मध्यंतराला २१-१ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. भैरवनाथ संघाकडून श्रीकांत चव्हाण, शुभम घुले, धीरज स्वामी, अभिषेक वेदपाठक यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मयुरेश्वर संघाकडून आदित्य भोले याने लढत देण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या लढतीमध्ये जयवंत क्रीडा प्रतिष्ठान, मुंढवा संघाने सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब संघाला ४१-६ असे एकतर्फी पराभूत केले. मध्यंतराला जयवंत संघाने २२-३ अशी आघाडी घेतली होती.
जयवंत संघाकडून दत्ता कोळी, सागर पवार, तुषार पवार यांनी सुरेख चढाया तर सिद्धांत चव्हाणने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. सोमेश्वर संघाकडून कृष्णा घोलपने पकडी तर साहिल झोरेने चढाया केल्या.
बाणेर युवा कबड्डी संघाने नुमवि प्रशाला संघाला ४१-१२ असे पराभूत केले. मध्यंतराला बाणेर युवा संघाने २६-३ अशी विजयी आघाडी घेतली होती.
बाणेर युवा संघाकडून ऋषी सुरवसे व नरेंद्र साळवे यांनी चांगल्या पकडी केल्या तर, योगेश शिंगटे व विनोद चौधरी यांनी आक्रमक चढाया करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नुमावी संघाकडून रोहित खाडेकर, सार्थक दिघे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.