लासलगाव : केंद्र सरकारच्या नाफेड व एनसीसीएफ या संस्थांमार्फत दुसऱ्या राज्यात कांदा पाठवणे सध्या बंद असल्याने कांद्याचे भाव स्थिर झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण होत असताना शुक्रवारी कांद्याच्या दरात २३०’ रुपयांनी वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ते चांगल्या दराच्या प्रतीक्षेत आहेत.
गुरुवारी लाल कांद्याला कमाल २६००, किमान ७०० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तर, शुक्रवारी लाल कांद्याला कमाल २८३०, किमान १००० व सरासरी २२०० रुपये भाव मिळाला. मध्यंतरी कांद्याचे दर निम्म्यावर आल्याने लासलगाव व येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती.
विधानसभा निवडणूक पार पडताच कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ लागल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करावे, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या १५ दिवसांपासून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने सरासरी १२०० ते १५०० रुपये भाव मिळत होता. त्यातून शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.