-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 24) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे एसी साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कंटेनर मधील क्लीनरचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्रिंन्स राजा सरूप परमाल (वय 23, रा. डोंगरकला ललीतपुर ता. पाली जि. ललीतपुर राज्य उत्तरप्रदेश) असे होरपळून मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. याप्रकरणी आकिलखान फखरूददीन खान (वय – 23, व्यवसाय ड्रायव्हर, रा.मु.पो. खंडेवाला ता. पाहडी जि.भरतपुर राज्य राजस्थान) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर पुणे महामार्गावरून चेन्नई येथून एसी भरलेला कंटेनर नंबर एच. आर 38 ए. डी 6426 हा भिवंडीकडे निघाला होता. त्यावेळी यवत येथील हॉटेल साळुंखे मिसळ परिसरात कंटेनरला अचानक भीषण आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालकाने क्लीनरला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झोपेत असल्याने उठला नाही. कंटेनर चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र क्लीनरला बाहेर पडता न आल्याने त्याचा जळून मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी सद्गुरु वाटर सप्लायर्स यांनी पुढाकार घेऊन तसेच अग्निशामक विभागाच्या जवानांनी ही आग तीन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कंटनेर मधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. यवत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन काळे, प्रकाश झेंडे, विकास कापरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती.