लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हिंदू धर्मीयांमध्ये मोठे धार्मिक महत्त्व असलेल्या श्रावणमासाला शुक्रवार (ता.२९) पासून प्रारंभ झाला. भगवान शंकराच्या प्रिय असलेल्या बेलासह अन्य फुलांच्या मागणीतही वाढ झाली.
लोणी काळभोर येथील श्री रामदरा तिर्थक्षेत्र देवस्थानाकडूनही मंदिरांची साफसफाई करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण महिना म्हटले, की अनेकजण शिव शंकराचे जपतप करतात. तर तरुणांसह तरुणी आपल्या इच्छेच्या फलश्रृतीसाठी भगवान शंकराला बेल अर्पण करतात. यात अकरा बेलापासून एक हजार एक बेल अर्पण करण्याचा संकल्प करतात. त्यामुळे बेलासह झेंडू, गुलाब, गुलछडी आदी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कालपर्यंत दहा रुपयांत असलेल्या मिक्स फुलांच्या वाट्याला दुप्पट पैसे म्हणजे वीस रुपये मोजावे लागले. बेलाच्या मागणी व दरांतही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हिंदू धर्मियांत श्रावण महिन्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. या काळात अनेकजण सात्विक आहारा बरोबरच काही संकल्पही करतात. त्यामुळे सोमवारी (ता. ०१) रामदरा शिवालयसह छोट्या-मोठ्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडी गावामध्ये पांडवकालीन ”श्री शंभू महादेव मंदिर” आहे. या मंदिराला प्राचीन परंपरा असल्यामुळे, भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या शिव मंदिरातली पिंड, पुरातन शैलीमध्ये असून मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह परिसरातील भाविकांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील प्राचीन महादेव मंदिर, व सोरतापवाडी येथील सोरतापेश्वर मंदिरातहि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, श्रावण महिना म्हटले, की उपवास, व्रतवैकल्यांचे दिवस. सहाजिकच या महिन्यात काही जण महिनाभर, तर काही शनिवार, सोमवारी उपवास करतात. अधिक मागणीमुळे शेंगदाणे, साबूदाणा, खजूर, भगर आदींच्या दरात तेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणावर केळीसह सफरचंद, पेरू दाखल झाले असून, त्याला चांगली मागणी आहे.