लहू चव्हाण
पाचगणी : ध्येय गाठायचे असेल तर कामाचा व अभ्यासाचा त्रास वाटत नाही. ओमकार पवार यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च नागरी सेवा परिक्षेमध्ये यश मिळवून स्पर्धार्थी युवकांसाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. असे गौरवोद्गार पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी काढले.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धा परिक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल ओमकार पवार (सलपाणे,ता.जावली) यांचा नगरपरिषदेच्या शाळां क्रमांक दोन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी दापकेकर बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक साहेबराव गोळे, पालिकेचे कर व्यवस्थापक धनंजय थोरात, शिक्षक श्रीकृष्ण काटसे, रोहण पवार, शांताराम दूधाणे वंदना शिंदे,कालिदास शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दापकेकर पुढे म्हणाले कि, ओमकार पवार आयपीएस परिक्षेला गवसणी घालूनही तेथेच थांबले नाहीत. त्यांनी नेठानी आणि निष्ठेने भारतीय प्रशासकीय सेवेचा अभ्यास केला आणि अभ्यासाच्या बळावर दैदिप्यमान यश मिळवले.
ओमकार पवार म्हणाले माझ्या मित्राने आवर्जून माझ्या यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सत्कार माझ्या कायम स्मरणात राहील. विद्यार्थ्यांनो कोणत्याही परिक्षेतील यश नशिबावर अवलंबून नसते तर परिश्रमावर, प्रयत्नांवर अवलंबून असते. हे मी माझ्या अनुभवातून सांगु शकतो.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमजान सय्यद यांनी केले तर आभार साहेबराव गोळे यांनी मानले आहेत.