पुणे: उप-मुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते बारामतीत विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या दरम्यान मेधा येथे पेट्रोल पंपच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधला. पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर नागरिक त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे जात होते.नागरिकांचे निवेदन स्वीकारत असताना अजित पवार हे अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश देत होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याने अनेक कामे रखल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या तक्रारीस समर्थन दिलं. या घडामोडींमुळेच मंचावर नागरिकांसोबत संवाद साधत असलेले अजित पवार संतापले आणि “तुम्ही मते दिली म्हणजे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का?” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका
“अरे तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलं का”? असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सगळं त्यांचं आहे. लोकांना उपाशी ठेवायचे ते ठरवतील. माझं मत आहे की, मला लोकांनी मतं दिली तर मी त्यांचा सालगडी आहे. एवढे दिवस सत्ता तुम्हाला या मतदारांमुळे मिळाली आहे. हा मतदारांचा अपमान आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.