मुंबई: सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत आहे. या अडचणी लक्षात घेत, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून ऑफलाइन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आयएमपीडीएस पोर्टलवरील अनऑटोमेटेड सुविधेमार्फत ऑफलाइन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली असून, याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून धान्य वितरण करण्याकरता स्वस्त धान्य दुकानांमध्ये ४जी तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. राज्यात काही दिवसांपासून धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यासाठी ऑफलाईन धान्य वाटपाची विनंती केली होती.