लहू चव्हाण
पाचगणी : सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी गोडवली (ता. महाबळेश्वर) गावाला आर्मीच्या १५ मराठा बुर्ज बटालियन युनिटच्या दोन अधिकारी व तेरा जवानांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी जवानांचे शाल व श्रीफळ देऊन मोठ्या उत्साहात स्वागत केले.
आर्मी जवान बेळगावपासून सिंहगड किल्ल्यापर्यंत सायकलिंगसाठी आले होते. प्रतापगड किल्ल्यावरून परत येताना त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली गावास भेट दिली.
यावेळी लेफ्टनंट मयंक नाईकनावरे, सुभेदार दिलीप डफळ, गावातील सुभेदार मेजर अंकुश चव्हाण यांच्याकडून नरवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घोषणा देण्यात आल्या.
गावात आलेल्या जवानांचे ग्रामपंचायतीच्या सभागृहात नरवीर तानाजी मालुसरे कोअर कमिटीचे राज्य अघ्यक्ष अंकूश मालुसरे, सरपंच मंगेश पवार, उपसरपंच विष्णु मालुसरे, जेष्ठ नागरिक तुकाराम मालुसरे, बापू शिंदे, मारुती मालुसरे, दिपक मालुसरे यांनी स्वागत केले. यावेळी तपणेश्वर सेवा मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी लेफ्टनंट मयंक नाईकनावरे म्हणाले, शिवकालीन असलेल्या गोडवली गावास नरवीराचा वारसा आहे. गावातील युवकांनी देशाच्या स्वसंरक्षणासाठी सैन्यदलात भरती होऊन वीर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमीला उजाळा द्यावा.