Tuljabhavani Devi Jwellery : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला शिवकालापासून अनेक दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत. त्याची नेहमी मोजदाद केली जाते. दरम्यान, भाविकांकडून अर्पण झालेल्या दागिन्यांमध्ये खोट्या दागिन्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुद्धता तपासणी यंत्रामधून खोट्या दागिन्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, भविष्यात किमती दागिने दान करणारे, तसेच खोटे दागिने विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या संबंधित सराफ व्यवसायावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. तसेच या घटनेत सहभागी असणाऱ्या दोषींवरही कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही मंदिर संस्थानकडून देण्यात आला आहे. कित्येक वर्षांपासून तुळजाभवानीमातेला भाविकांकडून अर्पण होणाऱ्या सोन्या-चांदीच्या दागदागिन्यांची नोंद मंदिर दप्तरी सोने-चांदीसदृश वस्तू म्हणूनच केली जायची. आताही तशीच नोंद घेतली जात आहे.
चार तोळे वजनाच्या भेट दिलेल्या पादुका चक्क तांब्याच्या
अलीकडच्या काळात तुळजाभवानी मंदिर संस्थानने सोने-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासणारी संगणकसदृश यंत्रणा सुरु केली असून ही मशिन काही सेकंदांतच खऱ्या-खोट्या दागिन्यांचा तपास करत आहे. सध्या अशा पद्धतीनेच भाविकांच्या किंमती वस्तूंची तपासणी सुरू आहे. यावेळी शोध मोहिम सुरु असताना सोन्यामध्ये चक्क ५० टक्के तूट आढळून आले आहे. एका भाविकाने भवानी मातेला ४ तोळे वजनाच्या पादुका भेट दिल्या होत्या. त्या चक्क तांब्याच्या असल्याचे या शुद्धता तपासणारी संगणकसदृश यंत्रणाने उघड केलं आहे. यामुळे मंदिर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दोषी नेमकं कोण? भाविक संभ्रमात
तुळजा भवानी देवीला दागिने अर्पण करणारे भाविक हे सत्य मनाने अर्पण करत असतात, तसेच या दागिन्यांची रक्कमही देतात. दागिने तयार करणारे सराफही त्याची शुद्धता तपासूनच दागिने देत असतात, पण मोजणी आणि तपासणीत हे दागिने खोटे कसे निघतात. याबाबत भाविकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे दोषी कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून करण्यात येत आहे.