शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशातून दर्शनासाठी येत असतात. यातील काही भाविक हे साईबाबाच्या चरणी रोख रक्कम किंवा सोने- चांदीचे दागिने अर्पण करत असतात. इंदूर (मध्य प्रदेश) येथील साईभक्त जुगल किशोर जैसवाल व पूजा जुगल जैसवाल यांनी साईचरणी २०० ग्रॅम सोने व ४७ ग्रॅम चांदीचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णमुकुट अर्पण केला आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी ही माहिती दिली आहे.
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. इंदूर येथील साईभक्त पूजा व जुगल किशोर जैसवाल या दाम्पत्याने शुक्रवारी येथे येऊन साईचरणी २०० ग्रॅम सोने व ४७ ग्रॅम चांदी इतक्या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णमुकुट साईचरणी अर्पण केला.
या मुकुटाची किंमत १४ लाख २० हजार ८०० रुपये आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी साईभक्त देणगीदार जैसवाल कुटुंबाचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.