नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिन्नर परिसरात या नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एकजणाचा गळा व दोन बोटे कापली गेल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरुन दुचाकीवरुन जाणारे नंदकुमार निगोजी मोटे (वय ५०) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेलया माहितीनुसार, नंदकुमार मोटे हे दुचाकीने संगमनेर नाका परिसरातून जात असतांना पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांज्या त्यांच्या गळ्यात अडकला. गळ्यात अडकलेला मांजा त्यांनी हाताने काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाताची दोन्ही बोटे कापली गेली आहेत.
गळ्यालाही झाली जखम..
गळ्यात अडकलेला मांजा काढत असताना गळ्याला देखील खोल जखम होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या गळ्यावर ३५ टाके पडले आहेत. एकुणच बंदी असूनही मकर संक्रात पुर्वीच नायलॉन मांज्याचा वापर होत असल्याच समोर आले आहे.
नायलॉनच्या मांजाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी त्याचा सर्रास वापर होतं दिसत आहे. आणि यातून अनेक दुर्घटना घडताना दिसत आहेत. दरम्यान मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जात असून यासाठी बाजारात मांजा विक्रीसाठी येत आहे.