नवी दिल्ली : तुम्ही देखील अनावश्यक कॉल्समुळे त्रस्त आहात? तर आता तुमची यापासून सुटका होऊ शकते. कारण, 1 सप्टेंबर 2024 पासून तुम्हाला नको असलेल्या कॉल्सपासून सुटका मिळू शकणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायकडून याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहे.
याबाबत ट्रायच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर आणीबाणीचा बेकायदेशीर फायदा घेऊन मेसेज पाठवले गेले तर संबंधित टेलिमार्केटर कंपनीची सदस्यता एका महिन्यासाठी रद्द केली जाईल आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास कंपनी काळ्या यादीत टाकली जाऊ शकते. त्यामुळे फसव्या कॉल्सला आळा बसेल, परंतु DLT वर नोंदणीकृत कंपन्यांचे कॉल आणि मेसेजिंग चालू राहतील. यासाठी ग्राहकांना स्वतः क्रमांक ब्लॉक करावे लागतील.
नैसर्गिक आपत्ती, अंतर्गत किंवा बाह्य सुरक्षा सूचना किंवा इतर आवश्यक माहिती देण्यासाठी ठराविक कालावधीसाठी (सामान्यतः 2 तास) क्रमांक अनब्लॉक केले जातात. या कालावधीनंतर हे नंबर आपोआप ब्लॉक होत नाहीत, याचा फायदा घेऊन मार्केटिंग कंपन्या मेसेजिंग आणि कॉल पुन्हा सुरू करतात.
स्पॅम कॉल्स फक्त या दोन नंबरवरून येतील
TRAI ने प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजसाठी एक नवीन सीरीज जारी केली आहे. नवीन नियमानुसार, व्हॉईस कॉलिंग मेसेज 140 मोबाईल क्रमांकाच्या सीरिजमधून येतील. तर आर्थिक व्यवहार आणि सर्व्हिस व्हॉईस कॉल 160 क्रमांकाच्या सीरिजमधून येतील, असे सांगितले जात आहे.