लहू चव्हाण
पाचगणी : आता पर्यटकांना पाचगणीच्या बसस्थानकातही वर्षा सहलीचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पांचगणी बस स्थानकात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचे तळे बनल्याने शालेय विद्यार्थी या पाण्यात मनसोक्त खेळताना दिसत आहेत.
मात्र प्रवाशांना या पाण्याने बसण्यासाठी जागा नसल्याने ते ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे आगार प्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.मागच्या पंधरा दिवसांपासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे पांचगणी बस स्थानक पाण्याच्या गळतीने पाण्याचे तळे बनले आहे.
स्थानकाचे छप्पर गळके असून त्यावरील पाणी काढण्यासाठी पाईप न बसावल्याने सर्व बसस्थानक गळू लागले आहे.त्यामुळे बसस्थानकात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.मुळात दर वर्षी पाचगणी व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे माहिती असूनही एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाईप बसविण्याचे नियोजन का केले नाही असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिकांकडून विचारला जात आहे.जागतीक पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी बसस्थानकाची अशी दुरवस्था झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
या गैरसोयीने प्रवासांची कुचंबणा होत असून प्रवाशांना अक्षरशः पावसात भिजत गाड्यांची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने यावर उपाय योजना करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.