नवी दिल्ली : तुम्ही नोकरी करत असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO चे मेंबर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी EPFO सतत काम करत आहे. यावर्षी जूनपर्यंत नवीन सॉफ्टवेअर प्रणाली EPFO 3.0 लाँच केले जाणार आहे. ही नवीन प्रणाली बँकिंग प्रणालीप्रमाणे काम करेल आणि त्याची वेबसाईट अधिक युजरफ्रेंडली बनेल.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, EPFO सदस्य एका निश्चित मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतील. त्यासाठी एटीएम कार्डही देण्याची योजना आहे. EPFO 3.0 लाँच झाल्यानंतर EPFO सदस्यांना एटीएम कार्ड दिले जातील. IT प्रणाली 2.01 अंतर्गत वेबसाईट आणि प्रणाली अपग्रेड करण्याचा पहिला टप्पा जानेवारी 2025 अखेर पूर्ण होईल. यानंतर, नावात चूक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मे-जूनपर्यंत ईपीएफओची संपूर्ण यंत्रणा बँकेप्रमाणे काम करण्यास सुरुवात करेल, असा दावाही करण्यात आला आहे.
सध्या पीएफ खातेधारकांना पैसे काढताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु सिस्टम अपग्रेड झाल्यानंतर तुम्हाला नावात चूक, आधार आणि बँक खाते क्रमांक अपडेट न होणे आणि जुन्या कंपनीचा पीएफ ट्रान्सफर न होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. सिस्टम अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर पीएफ काढण्यासह अनेक प्रकारची कामे सहज करता येतील. यानंतर, चुका पकडून त्या सुधारण्यास जास्त वेळ लागणार नाही, अशीही योजना आहे.