मुंबई: खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोण पालकमंत्री, यावरून महायुतीत मंत्रीपदासारखीच ओढाताण सुरू आहे. त्यातच मुंबईची दोन्ही पालकमंत्रीपदे कोणाकडे, हासुद्धा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणींनी मंत्रीपदे मिळवल्यानंतर आता पालकमंत्रीपदासाठी आग्रहाची भूमिका घेतली आहे, पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या आताच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु, भाजपकडून विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. तरीही बीडच्या पालकमंत्रीपदासाठी या दोन्ही नेत्यांकडून परस्पर दावा केला जात आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वीसुद्धा अनेक वाद निर्माण झालेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याकडे होते. तेव्हा शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तटकरेंविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले. आता महायुतीत अजित पवार यांचा समावेश. असल्याकारणाने रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असल्याने हा पेच सोडवायला मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खाते कायम ठेवण्यात आले असून, भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाणपट्टा विकास हे खाते देण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, मागील ४० वर्षांपासून मी शिवसेनेचे काम करतो. त्याचे फळ मिळाले आहे. मंत्रीपदाची ही संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली असून, सामाजिक न्याय या खात्याचे मंत्रीपद मला मिळाले. छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असून, यासंदर्भातील फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचेही शिरसाट म्हणाले. तर दुसरीकडे भाजपचे नेते, ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीसुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा केला असल्याने पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.