पुणे : पुणे शहरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न, कोयत्याने वार, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांद्वारे दहशत पसरवणे, महिलांची छेडछाड, खुलेआम ड्रग्सची विक्री असे अनेक धक्कादायक प्रकार सरत्या वर्षात पुण्यातील नागरिकांनी अनुभवले आहेत. पुण्यातील सराईत गुंड शरद मोहोळ याच्या खुनासह टोळ्यातील वर्चस्ववादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा काढण्यात आलेला काटा.
हडपसर परिसरात अनैतिक प्रेमसंबंधातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा पत्नीनेच प्रियकराला सोबत घेऊन केलेला गेम. पोर्शे कार अपघातात बड्या बापाच्या अल्पवयीन रईसजाद्याने मद्यप्राशन करून दोघांचा घेतलेला जीव, बोपदेव घाटात तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार अशा अनेक घटना २०२४ या वर्षात घडल्या, ज्याने संपूर्ण शहर हादरून गेलं. वाचा सविस्तर…
कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्याच साथीदारांनी केलेली हत्या
२०२४ या नवीन वर्षाची सुरुवातच पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने झाली. जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात (५ जानेवारी) गैंगस्टर शरद मोहोळचा भरदुपारी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात मुत्रा पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली. मोहोळ याच्यासोबत जवळीक साधून, मुत्रा पोळेकर याने आपला मामा नामदेव कानगुडे याच्या पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मोहोळच्या टोळीत प्रवेश करून खून केला. पुढे पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह खून करणाऱ्यांना अटक केली.
ऑगस्ट महिन्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला
पुणे पोलीस दलातील कर्तव्यावर असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकावर ऑगस्ट महिन्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला. आरोपींनी थेट डोक्यातच वार केल्याने अधिकारी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींच्या एका दिवसांत पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल चर्चा सुरू असतानाच पोलीस अधिकाऱ्यावरच झालेल्या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली होती.
माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा १ सप्टेंबरला खून
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर रविवारी रात्री ९ च्या सुमारास नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात टोळक्याने पिस्तुलातून गोळीबार करत कोयत्याने वार करून हत्या केली. मालमत्तेचा वाद आणि सोमनाथ गायकवाड याच्यासोबत असलेला टोळी युद्धातील पूर्वीचा संघर्ष या कारणातून वनराजचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड याच्यासह पाच जणांना अटक करून सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली.
बिल्डर पुत्राने घेतला दोघांचा जीव; गल्लीपासून ते जागतिक नकाशावर पोहचलेली घटना
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन बिल्डर पुत्राने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक देऊन दोघांचा जीव घेतला. ही घटना १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. काही तासांत त्याला जामीन झाला. या दोघांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करत अल्पवयीन मुलाच्या कृत्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तर दुसरीकडे आपल्या मुलाला वाचविण्यासाठी बड्या बिल्डर बापाने पैशाच्या जोरावर त्याने सरकारी व्यवस्था खरेदी करून पाहत ससून रुग्णालयात त्याच्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा पराक्रम केला. मात्र पोलिसांनी त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत हा डाव हाणून पाडला. त्यानंतर पुढे पोलिसांनी रईसजाद्याची आई आणि वडील, आजोबा यांना अटक केली.
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार
बोपदेव घाटातील टेबलपॉइंटवर मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर तीन नराधमांनी ३ ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी प्रत्येक पद्धत वापरली होती. मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा करत पोलिसांनी अखेर नराधमांना बेड्या ठोकल्या, टी-शर्टवर असलेल्या हॉटेलचे नाव आणि मद्यविक्रोच्या दुकानातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
शिर वेगळं धड वेगळं, त्या मृतदेहाने पुण्यात खळबळ
शहरातील चंदननगर भागातून वाहणाऱ्या मुठा नदीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे केले होते. ओळख पटू नये म्हणून या मृतदेहाचे शिर, धड वेगळं करून नदीत फेकलं होतं. भावानेच अवघ्या १० बाय १० च्या रूम वरून स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा निर्घृण खून केला. या घटनेचा तपास पुणे पोलिसांनी अतिशय शिताफीने केला.
कुरकुंभ, दिल्ली व्हाया लंडन ड्रगचा प्रवास
पुणे पोलिसांनी कुरकंभ औद्यागिक वसाहतीतील एका कारखान्यातून तीन हजार ६७४ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीत ही छापे टाकले. तपासात हे ड्रग लंडनला विक्री केले जात होते. सध्या याचा तपास मुंबईतील अमलीपदार्थ विरोधी विभागाकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली.
तसेच विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रॉन, कच्चा माल जप्त केला होता. तपासात विश्रांतवाडी, सोमवार पेठेतून जप्त करण्यात आलेले मेफेड्रॉन कुरकुंभ येथील कंपनीत तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानतंर कंपनी मालक भीमाजी साबळे, रासायनिक अभियंता युवराज भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगली परिसरात छापे टाकून कारवाई केली होती.
हातावर पोट असलेल्या कामगारांची ती काळरात्र
वाघोली परिसरात एका फुटपाथ वर झोपलेल्या ९ कामगारांना एका मद्यधुंद डंपर चालकाने चिरडलं. या अपघातात ९ जणांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये एक अवघ्या १ वर्षाची मुलगी आणि २ वर्षांचा चिमुरडा होता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी डंपर चालकाला तात्काळ अटक केली. अमरावती वरून पुण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
भाजप आमदार यांच्या मामाचा मामिनेच काढला काटा
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करत खून करण्यात आला. डिसेंबर महिन्यातील सोमवारी (दि. ०९) सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला होता. सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश यांचे फुरसुंगी फाटा परिसरात चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी अपहरण केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. पोलीस तपासात पाच लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे समोर आले. वाघ यांची पत्नी मोहिनी हिचाच या खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तिने जावळकर याला मोहिनी घालून पती सतीश वाघ यांचा खून करण्यास भाग पाडले. दरम्यान, मोहिनीचे जावळकर चाच्यासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध माहिती झाले होते, तर दुसरीकडे मोहिनी हिलादेखील सतीश यांचा त्रास होत होता. तसेच तिच्या डोक्यात मालमत्तेचा हव्यास शिरला होता. त्यातूनच तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.