संतोष पवार
पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे 52 वे राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे १९ जानेवारी २०२५ रोजी होणार असून या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली. राज्य शासनाने शिक्षकेत्तरांच्या अधिवेशनास परवानगी दिली असून संपूर्ण राज्यभरातून सुमारे चार ते पाच हजार शिक्षकेत्तर कर्मचारी अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी अपेक्षा खांडेकर यांनी व्यक्त केली आहे .
या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांना निमंत्रण देतेवेळी सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, पुणे जिल्हा शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, कार्याध्यक्ष प्रसन्न कोतूळकर आदी उपस्थित होते. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून सोडवण्यात आले असून सदरच्या अधिवेशनातही प्रलंबित मागण्या सोडवण्यात येणार असून त्यासाठी जास्तीत जास्त शिक्षकेत्तर बांधवानी अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन खांडेकर यांनी केले आहे.