पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) सवलतीच्या दरात प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना स्मार्ट कार्ड देण्यात येत होते. मात्र मागील काही दिवसांपासून स्मार्ट कार्ड तयार करणारे मशीन बंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना कागदी पास देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्मार्ट कार्ड बनवण्याचे काम ज्या कंपनीला दिले होते, त्याच कंपनीच्या तांत्रिक कामांमध्ये बिघाड झाला आहे. सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना नव्याने स्मार्ट कार्ड काढता येत नाही. मुदत संपलेल्या स्मार्ट कार्डचे नूतनीकरणही करता येत नाही. यामुळे कागदी पास देण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करताना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटी महामंडळाची सवलत मिळत होती. त्यानंतर आधार कार्डमार्फत सवलत देण्यास सुरुवात केली. मात्र हे कार्ड हाताळताना गहाळ होण्याची भीती अधिक होती. त्यात खराब होण्याची शक्यताही होती. एसटी महामंडळाने ६५ वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला होता.