लंडन : अन्नधान्याच्या किमती केवळ भारतातच नाहीतर जगभर वाढत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्नधान्य दर निर्देशांकाने एप्रिल २०२३ नंतरच्या सर्वोच्च पातळीला नुकताच स्पर्श केला. वनस्पती तेलांच्या भाववाढीमुळे गेल्या १९ महिन्यांत निर्देशांकाने सर्वोच्च पातळी गाठल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्नधान्याच्या दराचा मागोवा घेणारा संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेचा निर्देशांक गेल्या महिन्यात वाढून १२७.५ गुणांवर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये सुधारित अंदाजानुसार तो १२६.९ गुण होता. निर्देशांकाची गेल्या १९ महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.७ टक्के एवढी वाढ त्याने नोंदवली आहे. वनस्पती तेल निर्देशांकही एक महिना आधीच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या वर्षी या निर्देशांकाची पातळी ३२ टक्क्यांनी खाली होती.
आग्नेय आशियातील अतिवृष्टीमुळे पामतेलाचे उत्पादन घटण्याच्या भीतीमुळे भाव भडकल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर जागतिक स्तरावर मागणी वाढल्याने सोयाबीनसह मोहरी आणि सूर्यफूल तेलही कडाडले आहे. दिलासादायक बाब म्हणजे इतर अन्नधान्याचे भाव काहीसे घसरले आहेत. गहू आणि तांदळाच्या कमकुवत किमतीमुळे ऑक्टोबरपासून तृणधान्याच्या किमती २.४ टक्क्यांनी घसरल्या. ब्राझिलमधील ऊस उत्पादन घटण्याची चिंता मिटण्यासह भारत आणि थायलंडमध्ये साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्याने ऑक्टोबरपासून साखरेचे दरही २.४ टक्क्यांनी घसरले आहेत.