बारामती: वानेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर संपत चव्हाण यांच्या विरुद्ध दहा सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला. दरम्यान, सोमवारी (दि. ६) सदस्य मंडळाच्या मासिक सभेत उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. १) तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक झाली. याप्रसंगी सरपंच गीतांजली जगताप, तलाठी संजय खाडे, ग्रामसेवक विजय चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चव्हाण यांना पदावरून हटवण्याबाबत ग्रामपंचायतचे सदस्य सतीश गोरख जगताप यांनी बारामतीचे तहसीलदार यांच्याकडे दहा सदस्यांच्या सह्याचे निवेदन दिले होते.
सदस्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपसरपंच सागर चव्हाण यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर केला. सतीश जगताप, रविराज जगताप, अजित भोसले, रमेश घाडगे, वनिता कोकरे, मंगल मुळीक, अजमा शकीलकर, मयूरी पवार, सोनाली निकम, शारदा जाधव, वंदना चौगुले या ग्रामपंचायत सदस्यांची तहसीलदार यांनी तातडीने दखल घेतली.