पुणे : पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने येत्या बुधवारी (दि. ४ डिसेंबर) इयत्ता तिसरी, सहावी, नववीच्या विद्यार्थ्यांची परख राष्ट्रीय सर्वेक्षण-२०२४ अंतर्गत अध्ययन निष्पत्ती तपासण्यात येणार आहे. परख राष्ट्रीय सर्वेक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील १६६ निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता तिसरी, सहावी व नववीमधील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. परख राष्ट्रीय सर्वेक्षण इयत्ता तिसरी पायाभूत स्तर यामध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांच्या पायाभूत स्तरावरील अध्ययन निष्पत्तीचा समावेश असणार आहे.
इयत्ता सहावी पूर्वतयारी स्तरामध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांच्या पूर्वतयारी स्तरावरील अध्ययन निष्पत्ती समावेश असेल. इयत्ता नववी, मध्यस्तर भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या पैकी तीन विषयांच्या मध्यस्तरावरील अध्ययन निष्पत्ती यावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश असेल. तीसरीच्या ५१, सहावीच्या ५१, नववीच्या ६४ शाळांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
सर्वेक्षणासाठी नवी दिल्लीतील एनसीईआरटी यांनी शाळा निहाय निरिक्षकांची नेमणूक केली आहे. १६६ शाळांसाठी २१७ क्षेत्रीय अन्वेषकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वेक्षणांसाठी जिल्हा समन्वयक म्हणून पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून तर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये १०० दिवसांचा गुणवत्ता वृध्दी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मूलभूत क्षमता विकसनासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला आहे. राज्यस्तरावरून नियतकालिक चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यामधील प्रश्न अध्ययन निष्पत्तीवरती आधारित होते. त्यामुळे अध्ययन निष्पित्तीवर आधारित मुलांचा प्रश्नांचा सराव झालेला आहे. या बाबीचे प्रतिबिंब ‘परख’ राष्ट्रीय सर्वेक्षण मधून दिसून येईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केले आहे.