पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने तिच्या अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. वारजे, कात्रज पाठोपाठ पेरणे गावात अशाच प्रकारची ही तिसरी घटना घडली आहे. ही घटना १० ऑक्टोंबर रोजी लोणीकंद येथील तळेराण वस्ती जवळील खडी मशीन परिसरातील मोकळया जागेत मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल लालसिंग ठाकुर ( वय-३०, रा. वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, पेरणेगाव ) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी अनिल याचा भाऊ सुनिल लालसिंग ठाकूर (वय-३२, रा. पेरणे फाटा) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमित्रा लालसिंग ठाकूर (रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा) हिला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा प्रियकर प्रफुल पुंडलिक ताथोड (वय-३५) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ठाकूर हा काहीही कामधंदा करत नसे. अनिलला खूप दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी सुमित्रा ठाकूर हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात सतत भांडणे होत असत. अनिल ठाकूर हा दारु पिऊन तळेराण वस्ती जवळील खडीमशीन
परिसरातील मोकळ्या जागेत पडला होता.
दरम्यान, आपल्या प्रेमात अडथळा ठरलेल्या अनिलच्या डोक्यात दोघांनी मिळून दगड घालून त्याचा खून केला आहे. अनिल याचा खून झाल्याची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील परीसारतील पाहणी केली.
पोलिसांच्या चौकशीत सुमित्रा ठाकूर हिचे प्रफुल ताथोड याच्याबरोबर असलेल्या प्रेम संबंधाची माहिती दिली. पोलिसांनी सुमित्राकडे कसुन चौकशी केल्यानंतर तिने मी प्रफुलच्या मदतीने अनिलच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून, प्रफुल ताथोड याचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.