पुणे : कारागृहात जन्मलेल्या नवजात शिशूंना आता नवीन ओळख मिळणार आहे. यापूर्वी त्यांच्या जन्म दाखल्यावर जन्म ठिकाण म्हणून संबंधित कारागृहाचे नाव लिहिले जायचे. मात्र आता कारागृहात जन्म झालेल्या बालक, बालिकांच्या जन्म दाखल्यावर जन्मस्थान म्हणून त्या शहराचे किंवा गावाचे नाव नमूद केले जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिले आहे.
गरोदर स्त्रियांनी गुन्हा केल्यानंतर त्यांना अटक केली जाते. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अनेक महिला कारागृहामध्ये शिक्षा भोगण्यासाठी पाठविल्या जातात. राज्यात महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे.
दरम्यान, गरोदर असलेल्या महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे जन्म दाखले शासकीय नियमाप्रमाणे तयार केले जातात. यापूर्वी या जन्मदाखल्यांवर जन्मस्थान म्हणून संबंधित कारागृहाचे नाव नमूद केले जात होते. त्यामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर या मुलांना विविध शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड होते. तसेच त्यांना नोकरी-व्यवसाय करण्यासाठी देखील दाखल्यावरील जन्म ठिकाणाच्या नोंदीमुळे अडचणी येत होत्या.
मात्र, यासंदर्भात राज्य शासनाने संवेदनशीलपणे विचार करून कारागृहात जन्म घेणाऱ्या बालक बालिकांच्या जन्मस्थानाचा मुद्दा आता निकाली काढला आहे. यापुढे कारागृहात जन्म घेतलेल्या मुलांच्या जन्म दाखल्यावर कारागृह ज्या शहरांमध्ये किंवा गावामध्ये असेल, त्या शहर किंवा गावाचे नाव नमूद करण्यात येणार आहे. असे आदेश काढले आहेत. त्यामुळे मुलांसमोर भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळणार आहे.