नाशिक : विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अपयश आल्याने आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक शहर कार्यकारिणीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शहर आणि जिल्हा पक्ष संघटनेच्या कार्यकारिणीत कुणाला जबाबदारी दिली जाते याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटासह महाआघाडीलाही खाते उघडता आले नाही. यात सहा जागा ठाकरे गटाने लढविल्या होत्या. त्यापैकी नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली या तीन जागा शहरातील होत्या. शहरासह जिल्ह्यातील जागांवर विजयी मिळविता न आल्याने त्याविषयीचा आढावा घेण्यासाठी, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कोअर कमिटीच्या सदस्यांना निमंत्रित केले होते. शहर व जिल्ह्यात नव्याने पक्ष संघटना बांधण्याच्या दृष्टीने त्यांनी नाशिक जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचे संकेत पदाधिकाऱ्यांना दिल्याने आता कोण राहणार आणि कुणाला पायउतार व्हावे लागणार, याकडे कार्यकत्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या, बैठकीत सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, माजी महापौर अॅड. यतीन वाघ, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी चांगली मेहनत घेतली. परंतु यश आले नाही, संपूर्ण राज्यातच अनाकलनीय निकाल लागले असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आवाहन केले.