पुणे : कनेरसर (ता. खेड) येथे औद्योगिकीकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून खुनाच्या गंभीर घटना घडल्या आहेत. ठेकेदारी व स्पर्धेतून मारामारीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. नुकतीच २४ डिसेंबर २०२४ रोजी कनेरसर येथे दोन गटांमध्ये भांडणे, मारामारी झाली. हत्यारे काढण्यात आली. याबाबत पोलीस चौकीच्या प्रस्तावाची तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव राजेंद्र खंदारे व विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांनी पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांना फोन
करून पोलीस चौकीबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
याबाबत पोलीस चौकीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्याचे टाव्हरे यांनी सांगितले. टाव्हरे यांनी सांगितले की, साडेचार वर्षांपूर्वी कनेरसरचे उपसरपंच नवनाथ झोडगे यांचा खून झाला होता. तेव्हा तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन दिले होते. खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चौकीसाठी तीन गुंठे जागाही पोलिसांकडे हस्तांतरित केली. मात्र, पुढे काहीही कार्यवाही झाली नाही.
मागील वर्षी कनेरसरचे ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक संतोष दौंडकर यांची निघृण हत्या झाली. दोन वर्षांत ठाकर समाजाच्या दोन युवकांचेही निमगाव परिसरात खून झाले आहेत. मागील वर्षीच्या नागपूर अधिवेशनात अशोकराव टाव्हरे व भाजप विधानमंडळ सचिव राजूशेठ खंडीझोड यांच्या पाठपुराव्यानुसार आमदार प्रवीण दरेकर, उमा खापरे, रमेश पाटील, भाई दरेकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवेदन प्राप्त झाल्याचे नमूद करून १८ मे २०२२ रोजी खेड पोलीस ठाण्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना प्रस्ताव प्राप्त झाल्याचे म्हटले होते. तसेच शासनाकडे प्रस्ताव आल्यास कार्यवाही होईल. विलंब होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे लेखी उत्तर दिले होते.
कनेरसर परिसरात अवैध दारू व इतर धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या दबावातून तात्पुरती पोलीस चौकीही सुरू केली जात नाही, असा आरोप टाव्हरे यांनी निवेदनात केला आहे. कनेरसर परिसरात पोलीस चौकी झाली तर नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होईल. सातत्याने भांडणे व मारामारीचे प्रकार होत आहेत. पोलीस तात्पुरती मलमपट्टी करणार व नंतर परिस्थिती ‘जैसे थे’ असते. कनेरसर सेझ परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी होईपर्यंत तात्पुरती बीट चौकी होणे नितांत गरजेचे आहे, अशी मागणी अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे.