Neelam Gorhe : नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यानिमित्त अधिवेशन सुरू होण्याआधी विधानपरिषधेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरे यांनी कधीच ऐकून घेतली नाही, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फुटलीच नसती. योग्य ती बाजू घेणे आणि वेळेवर कारवाई करणे, ही बाळासाहेबांची पद्धत होती. “बाळासाहेबांनंतर शिस्त पाळली गेली नाही. एखाद्याने शिस्त पाळली नाही तरच कठोर होणं, हा त्यांचा पवित्रा होता. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पक्षाने (उद्धव ठाकरे ) कधीही त्यांची विचारणा केली नाही. शिंदे यांचे काय प्रश्न आहेत? आमदारांना निधी मिळत नाही, ठिकठिकाच्या जिल्हाप्रमुखांची साधी मागणी होती की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट करून द्या. पण तीही मागणी पूर्ण होत नव्हती. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांवर दबावही होता.”
मी सुद्धा उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की, तुम्ही जिल्हानिहाय आमदारांच्या बैठका घ्या. काही धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत आमदारांनाही अवगत करा, जेणेकरून आमदारांचा कामातला आत्मविश्वास वाढेल. परंतु याबद्दल काही घडलं नाही. त्यामुळे शेवटी या बाबी धुमसत गेल्या आणि त्याचा स्फोट झाला. ही वस्तूस्थिती आहे. मग अशावेळी दुसरा पक्ष जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर आतमध्ये काही अस्वस्थता नसती, तर कुणाला अशी संधीच मिळाली नसती. मला वाटतं बाळासाहेब असते, तर त्यांनी वेळीच राजकीय भूमिकेबद्दल सावध केले असते.