संतोष पवार / पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. २ (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी भुयारी मार्ग कधी बनविणार असा सवाल वाहनचालकांतून होत आहे. सध्या कळस-वालचंदनगरकडून आलेल्या वाहनांच्या सोईसाठी येथे सुमारे ११० मिटर लांबीच्या सेवा रस्त्याचे काम केले जात आहे. वास्तविक वालचंदनगरकडे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या लक्षात घेवून येथे उड्डाणपुलाची गरज आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सेवा रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाल्याने सदर होणारे काम म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या उक्तीप्रमाणे असल्याची प्रतिक्रीया स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाला येथे कुंभारगाववरुन डाळज क्र. २ मार्गे येणारा रस्ता जोडला आहे. शिवाय वालचंदनगर -जंक्शन-कळसवरुन आलेला रस्ताही याठिकाणी जोडला गेला आहे. येथे रस्त्याच्या एका बाजूला सेवा रस्ता आहे. मात्र महामार्गावरुन सेवा रस्त्यावर जाणारा जोडरस्ता येथे तयार करण्यात आला नाही. तर पुण्याच्या दिशेने आलेल्या वाहनांना महामार्गावर वालचंदनगर रस्त्याकडे वळण्यासाठी येथे वाढीव लेनची (वेटींग लेन) सोय नाही. तर सोलापूरकडून आलेल्या वाहनांना कुंभारगाव-डाळज गावांकडे वळण्यासाठी येथे वाढीव लेन (वेटींग लेन) नाही.
परिणामी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करावी लागतात. काही वाहने वळत असताना विरुध्द दिशेने वेगात आलेल्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने येथे वारंवार अपघात होत आहे. यामध्ये स्थानिकांबरोबर बाहेरच्या अनेकांनी आपला जीव गमविला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आल्याची उदाहरणे आहेत. रस्त्याची ही वस्तूस्थिती स्थानिकांनी आमदारांपासून ते खासदारांपर्यंत मांडली आहे. मात्र यावर अद्यापपर्यंत काहीच उपाययोजना झालेली नाही.
सध्या येथे वालचंदनगर-कळसकडून आलेल्या वाहनांना मुख्य महामार्गावर पोचण्यासाठी ११० मिटर लांबीचा सेवा रस्ता तयार केला जात आहे. मात्र यातून येथे वाहतूकीच्या गैरसोयीचा कायमचा प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रीया स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. येथे वालचंदनर-कळस, कुंभारगांव रस्त्याला जोडण्यासाठी महामार्गावर पुल बांधून, महामार्गावरुन येणाऱ्या वाहनांना या पुलाची सोय करता येणे शक्य होईल. इंदापूरजवळ ज्याप्रमाणे महामार्गाचे अंडरपास काम करण्यात येत आहे, त्याप्रमाणे डाळज येथेही अशा स्वरुपाचे काम करणे गरजेचे आहे.
दरम्यान, महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरिक्षक महेश कुरेवाड म्हणाले, डाळज क्र. २ गावाच्या चौकात वहातूकीच्या दृष्टीकोनातून आवश्यक उपाययोजना होणे गरजेचे आहे. सध्या वालचंदनगर रस्त्याचे काम सुरु आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक वाढणार आहे. महामार्गाला जोडणारा हा प्रमुख राज्यमहामार्ग असल्याने, येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे.
वारंवार होतात अपघात
डाळज क्र. २ येथील या चौकात वारंवार अपघात होतात. विशेषतः चारचाकी मोटार व मोटारसायकल यांच्यामध्ये नेहमी अपघात होत असतात. एक-दोन दिवसाआड एक अपघात होत असल्याचे येथील स्थानिक सांगतात. तर अनेकदा येथे गंभीर अपघात झाले असल्याचेही बोलले जात आहे. दोन्ही बाजूने वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होण्यासाठी येथे ठोस उपाययोजना नाहीत. तर वळणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी वेटींग लेन नाही. परिणामी वेगाने येणारी वाहने व वळणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने येथे अपघात होत आहेत.