लहू चव्हाण
पाचगणी : सुरक्षित व निरोगी जीवनासाठी ज्येष्ठांनी सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज आहे. असे आवाहन स्विट मेमोरिज हायस्कूलचे प्रिन्सिपॉल अजय सोनावणे यांनी केले.
पाचगणी येथील जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून जागतिक वृध्ददिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोनावणे बोलत होते. यावेळी जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोरभाई पुरोहित, उपाध्यक्ष जयवंत बगाडे, सचिव सुरेश भिलारे, सहसचिव अनिल बागडे, कोषाध्यक्ष संपतराव खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनावणे पुढे म्हणाले, आपआपल्या क्षेत्रात कामाच्या व्यस्ततेत जगत असतांना आतील कलागुण लुप्त होतात. मात्र निवृत्ती नंतर दळलेल्या कलागुणांना पून्हा पुनर्जीवित करण्याचे काम ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे. यावेळी पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या दांपत्याचा व पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, कष्टामुळेच मानसांचे सत्व सतेज होते आणि उर्जा उजळत राहते. चा परिचय देणाऱ्या सिंहगड पदभ्रमण करून रायगड चढण्याचा मानस असणाऱ्या ८७ वर्षांच्या बोडस आजी आपल्या दैनंदिन कामात कोणताही खंड पडू न देता पाचगणी टेबललॅंन्ड येथील गुहेतील उपहारगृह चालवतात. दिवसातून दोन वेळा पायी ये-जा करतात. त्यांच्या या कर्तबगारीमुळे त्यांना दिर्घायुष्य लाभलं आणि त्यांच्या परिश्रमी वृत्तीचा, ज्येष्ठत्वाचा सन्मान म्हणून पाचगणी येथील जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठांनी आपल्या कलागुणांना वाव दिला. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक अनिल बागडे यांनी केले.सुत्रसंचलन सुरेश भिलारे तर किशोरभाई पुरोहित यांनी आभार मानले.