लोणी काळभोर : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (ता.13) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 3 लाख 13 हजार 840 रुपये किंमतीचा 14 किलो 182 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस व पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक एकच्या पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे.
साहिल विनायक जगताप (वय-28, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-1 व लोणी काळभोर पोलीस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी गांजाची तस्करी होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी साहिल जगताप याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये 3 लाख 13 हजार 840 रुपये किंमतीचा सुमारे 14 किलो 182 ग्रॅम गांजा आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी साहिल जगताप याला अटक केली आहे. तर त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.
सदरची कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोसे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बालाजी बांगर, ईश्वर भगत यांच्या पथकाने केली आहे.