बीड: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असताना बीडमध्ये मात्र महायुतीमध्ये फूट पडत असल्याचे दिसत आहे. भाजप आमदार सुरेश धस हे युती धर्म पाळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. बीडमधले राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार असे सर्वच पदाधिका ऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व माजी आमदार संजय दौंड यांनी दिली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सुरेश धस युतीधर्म पाळत नाहीत; या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे माजी आमदार संजय दौंड यांनी म्हटले आहे. संजय दौंड बीडच्या अंबाजोगाई येथे राष्ट्रवादीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आजी माजी आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
भाजप आमदार सुरेश धस हे आपल्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. अर्थात त्यांच्याकडून युती धर्म पाळला जात नाही. या सर्व कारणामुळे राष्ट्रवादीचे आजी माजी आमदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे, सुरेश धस यांच्याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीसाठी पक्षाची दारं बंद
संजय दौंड म्हणाले कि इथूनपुढे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आता प्रत्येकाचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासले जाणार आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच २६ जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची पूर्ण कार्यकारणी बरखास्त केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अशा एकाला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे राजेश्वर चव्हाण यांनी म्हटले आहे.